सुर्याभोवती 6800 वर्षांची दीर्घ वर्तुळाकार कक्षा पूर्ण करणारा निओवाईज धूमकेतू पुन्हा पृथ्वीभोवतीच्या अवकाशात दिसू लागलाय.
14 जुलैपासून 4 ऑगस्टपर्यंतचे 20 दिवस हा धूमकेतू साध्या डोळ्यांनी पाहण्याची अनोखी संधी महाराष्ट्रासह संपूर्ण पृथ्वीवासियांना लाभणार आहे. सुर्यास्तानंतर वायव्य दिशेला म्हणजेच उत्तर - पश्चिमेच्या आकाशात हा धूमकेतू पाहता येईल.
सध्या देशात मान्सूनचं आगमन झाल्याने निरभ्र आकाश सापडणं दुर्मिळ आहे. मात्र, ही संधी उपलब्ध झाली तर हा दुर्मिळ धूमकेतू पाहणं सोडू नका. कारण, या 20 दिवसानंतर पुढची काही हजार वर्षं हा धूमकेतू दिसणार नाही.
निओवाईजचा शोध....
या धूमकेतूचा शोध यावर्षीच 27 मार्चला लागला. याबद्दल ओडीसा इथल्या प्लॅनेटोरियमचे उपसंचालक पथानी समंता यांनी एएनआय वृत्तसंस्थेला माहिती दिली. ते सांगतात, "27 मार्चला वायव्येकडच्या आकाशात नासाच्या दुर्बिणीला या धूमकेतूचा शोध लागला. याचा खगोलीय भाषेतील क्रमांक हा C/2020 F3 आहे. पुढचे दिवस सुर्यास्तानंतर हा धूमकेतू दिसेल."
नासाने या धूमकेतूविषयी आपल्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती दिली आहे. 27 मार्चला हा धूमकेतू सुर्याजवळून जाताना नासाच्या 'निअर अर्थ ऑब्जेक्ट वाईल्ड फिल्ड इन्फ्रारेड सर्व्हे एक्सप्लोरर'
(निओवाईज) या स्पेस टेलिस्कोपने या धूमकेतूचा शोध लावला.
धूमकेतू कधी पाहता येईल?
"हा धूमकेतू सायंकाळी 6 नंतर रात्री साडेनऊपर्यंत पाहता येईल. आकाश स्वच्छ असेल तर तो भारतातून सगळीकडून दिसेल. येत्या 17 जुलैपर्यंत तो सकाळी सुर्योदयापूर्वीही दिसू शकेल. जेवढा तो उशिरा पाहायला जाऊ तेवढा तो अंधुक होत जाईल.